जीवन रंगाचा प्रभाव व अनुभूती
जहांगीर आर्ट गॅलरीत जितेंद्र गायकवाड यांच्या वास्तवदर्शी कलाकृतींचे प्रदर्शन
प्रचलित कलाक्षेत्रातील सुप्रसिद्ध चित्रकार जितेंद्र गायकवाड यांच्या नवनिर्मित चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगीर कलादालन, मुंबई येथे दिनांक ९ ते १५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत भरणार आहे. तेथे सर्वांना रोज सकाळी ११.०० ते संध्याकाळी ७.०० वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. या प्रदर्शनात त्यांनी ठेवलेली विविध चित्रे प्रामुख्याने मानवी आयुष्यात असणारे जीवनरंगाचे महत्त्व आणि त्यांचे अविस्मरणीय प्रभाव प्रकर्षाने दर्शवतात.
ह्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सोमवार दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता सन्माननीय प्रमुख अतिथी डॉ. विजय सूर्यवंशी IAS, कमिशनर राज्य महसूल महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते जहांगीर कलादालन येथे होईल. त्याप्रसंगी खास अतिथी म्हणून डॉ. निलेश खरे सकाळ मिडिया ग्रुप मुंबई व श्री सचिन मदाने बोर्ड ऑफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर वेल्थजेनिक एज्युकार्ट प्रा.लि. मुंबई यांची उपस्थिती राहील.
जितेंद्र गायकवाड यांचे बालपण पेन येथील निसर्गरम्य परिसरात गेले. अर्थात त्यामुळे त्यांच्यावर तेथील निसर्गातील विविध घटकांचा व चमत्कृतींचा वेगवेगळ्या ऋतूत होणारा दृश्यमय अविष्कार यांचा प्रभाव पडला व तशी अनुभूती त्यांना तो चित्रमय रूपात सादर करण्याची प्रेरणा मिळाली. न्यू पनवेल येथील ऋषिकेश चित्रकला महाविद्यालयात त्यांचे ATD पर्यंत कलाशिक्षण झाले. नंतर त्यांनी मुंबई, पुणे, ठाणे, गोवा बेंगलोर वगैरे बऱ्याच ठिकाणी आपली चित्रे एकल व सामूहिक प्रदर्शनातून नामांकित कलादालनात ठेवली. त्यांच्या प्रदर्शनांना सर्व रसिक व कलाप्रेमींचा सदैव सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी चित्रसादरीकरण करून विविध आर्टकॅम्पमधून चित्रकलेच्या प्रसारासाठी आपले योगदान दिले आहे. बऱ्याच प्रवर्तक संस्थांकडून त्यांना पुरस्कार देण्यात आले असून त्यांची चित्रे अनेक नामवंत व प्रथितयश भारतीय व विदेशातील मान्यवर संग्राहकांकडे आहेत.
प्रस्तुत प्रदर्शनात त्यांनी कॅनव्हासवर तैलरंग व ॲक्रिलिक रंग वापरून व आर्ट पेपरवर सॉफ्ट पेस्टल वापरून काढलेली विविधांगी वास्तववादी शैलीतील चित्रे मानवी जीवनात असणारे अनेक रंगांचे महत्त्व व संवेदनशील अभिव्यक्तीत्व दर्शवणारी अनुभूती अधोरेखित करतात. विविध ऋतूतील निसर्गाची ती विलोभनीय रूपे, भारतीय परंपरा व संस्कृती यांचे उत्कट दर्शन साकारणारी ती चित्र धार्मिक स्थळांवरील व ऐतिहासिक स्थानांवरील वैशिष्ट्ये, ग्रामीण व नागरी जीवनाची मूल्ये, सामाजिक जीवनातील वैशिष्ट्ये वगैरे फार प्रकर्षाने दर्शवितात. निसर्गाच्या सानिध्यात फुलणारी मानवी मने व त्यातील वैविध्य, खेळताना ग्रामीण परिसरातील मुलांची खेळकर वृत्ती व आनंददायी मानसिकता, ऐतिहासिक स्थळांवरील व्यक्तीदर्शन व तेथील संस्कृती, परंपरा, सणसमारंभ साजरे करण्याची उत्कट वृत्ती, विविध परिस्थितीतील मानवी मनोभावनांचे वास्तविक प्रकटीकरण वगैरेमुळे ती चित्रे फार मनोहर आणि चित्ताकर्षक आहेत. ती पुरेशी बोलकी अर्थपूर्ण असल्यामुळे सर्वांशी सुसंवाद साधतात आणि त्यांची दाद मिळवतात.
अशा ह्या रम्य व विलोभनीय चित्रप्रदर्शनाला सर्वांचा उदंड व सकारात्मक प्रतिसाद लाभेल आणि त्यामुळे चित्रकार जितेंद्र गायकवाड यांना योग्य ती प्रेरणा व स्फूर्ती तसेच त्यांच्या उर्वरित कला प्रवासात आणखी कलात्मक अविष्कार सादर करण्यासाठी यथायोग्य प्रोत्साहन लाभेल हे निर्विवाद.
चित्रकार: जितेंद्र गायकवाड
स्थळ: जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई
कालावधी: ९ ते १५ सप्टेंबर २०२४
वेळ: सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजता