नेहरु सेंटर आर्ट गॅलरीत युवा प्रतिभाशाली चित्रकार
सारंग हुंडीवाला यांच्या कलाकृतींचे “त्रिपर्ण” हे चित्रप्रदर्शन
विलक्षण रंगरेषांची नवी भाषा सांगणारे चित्रप्रदर्शन
औरंगाबाद येथील युवा प्रतिभाशाली चित्रकार सारंग हुंडीवाला ह्यांचे “त्रिपर्ण” हे चित्र प्रदर्शन नेहरु सेंटर आर्ट गॅलरी, डॉ . ऍनी बेझंट रोड, वरळी, मुंबई येथे दिनांक: २४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत या वेळेत सर्व कला रसिकांसाठी विनामूल्य खुले राहील.
आपल्या संस्कृती मध्ये तीन संख्येचे स्थान लक्षणीय..., त्रिमूर्ती दैवी शक्तीचे अधिष्ठान आणि तीन तत्त्व मानवी वृत्तीचे कारक. वैश्विक कार्याचे परिचालन करणाऱ्या त्रिमूर्ती सृजन, नियंत्रण आणि परिवर्तन असा परस्पर संबंध दर्शवणाऱ्या आहेत. त्रिपर्ण असलेला बेल तेवढाच पूजनीय. आपण सत्याचा ठाम पणा दर्शवतानाही त्रिकाल अबाधित असा उल्लेख करतो. या अनुषंगाने तीनचे महत्त्व जाणून वेगळी संकल्पना मांडणारे प्रदर्शन ' त्रिपर्ण'! झेन कला, मंदिर वास्तु शिल्प आणि ऐश्वर्याचे प्रतीक असलेला 'ऐरावत' अशा तीन संकल्पना मूर्त रूप देणारे 'त्रिपर्ण'म्हणजे सारंगच्या वैविध्यपूर्ण चित्रकलेचा अविष्कार. यातील वैशिष्ट्य म्हणजे अतिनील किरणांच्या (अल्ट्राव्हायलेट) साहाय्याने चमकणारे रंग ( फ्लोरोसेंट कलर). प्रभावी शैलीतील ही कला वेगळी अनुभूती देणारी जी चोखंदळ रसिक, कलाप्रेमी यांना आनंद देताना चकित सुद्धा करण्याची क्षमता बाळगणारी.
उत्साही तरुण कलाकाराची चिंतनशील कला
‘ कला अंत:प्रेरणा आणि मनःशांतीचे सर्वोत्तम माध्यम आहे. तुमचे स्वतःवर प्रेम असेल तर ते तुमच्या कामातून नक्कीच दिसून येते.’ हा सारंगचा विश्वास, हाच त्याच्या कलेचा श्वास. एकांतात वेळ व्यतीत करताना, संस्कृती-वारसा कलेचा मागोवा घेताना त्याची रेखाटने, ब्रश आणि भावनांचा प्रवाह, यातून साकारत जातात कलाकृती. या कलाकृती मग मेळा असतात संस्कृती, सृजनशीलता, कल्पना आणि भावभावनांचा. अध्यात्म, पौराणिक व्यक्तिचत्रे-कथानक, संस्कृती यांचा वापर करत सारंगचा कॅनव्हास रंगत जातो. बालवयातच चित्रकलेचा छंद, पुढे उत्कटता वाढली- आवड वाढत गेली हा मग रंगरेषांच्या विश्वात वावरू लागला. कुटुंबातून कलेचा कोणताही वारसा नसलेला सारंग हा पहिल्या पिढीचा चित्रकार. कला शाखेतील शास्त्रोक्त शिक्षण नाही, पण कलासक्त रसिकांना, चोखंदळ – मर्मज्ञ कलाप्रेमींना आकृष्ट करणारी कलाकृती. बारीक रंगरेषा- विशेषतः झेन आर्ट, मंदिर शिल्प –वास्तुकला हा त्याचा प्रांत, संस्कृतीप्रती असलेली ओढ दर्शवणारा. त्याच्या संकल्पना समृद्ध वारसा कॅनव्हासवर आणताना भारतीय संस्कृतीशी असलेले घट्ट नाते सांगतात. रचना सूक्ष्मता दर्शविताना आशयघनता जपतात आणि नवाच अविष्कार प्रत्ययाला येतो. कलाकृतींमधून दिसणारी शैली अभिनव आहे म्हणूनच रसिकांना स्तब्ध करते. सारंगने अनेक ग्रुप एक्झिबिशन्स मधून स्वतःचे वैशिष्ट्य सिद्ध केले, दाद मिळवली. हे त्याचे पहिले स्वतंत्र चित्र प्रदर्शन काही.. मोहक आणि विशेष कलाकृतींसह ..
**
एकाग्रतेचा अविष्कार झेन आर्ट
झेन कलेचा वापर आंतरिक शांती आणि स्थैर्य यासाठी केला जातो आणि याचा स्रोत आहे गौतम बुद्ध. अमर्याद सर्जनशीलतेचा परिचय देणारी ही कला, ज्यामध्ये ध्यान, मन :शांती, शिस्तीसोबतच आहे अद्वितीय सौंदर्य शास्त्राचा परिचय. 'झेन टॅंगल ' कलाप्रकार मानसिक ताणतणाव कमी करून मन:शांती देणारा. बारीक रंगरेषांचा अविष्कार जिथे स्थैर्य अविभाज्य आणि त्यासाठी लागते एकाग्रता. यातून झेन आर्ट साकारते. जे दिसतं सारंगच्या कलाकृतींमधूनमी झेन आर्ट ने त्याला ध्यानधारणे कडे, आंतरिक शक्तीच्या शोधात नेण्यास सुरुवात केली आणि या कलेने मग गौतम बुद्धांचे अनेक.
युवा प्रतिभाशाली चित्रकार: सारंग हुंडीवाला
स्थळ: नेहरु सेंटर आर्ट गॅलरी, वरळी, मुंबई
कालावधी: दिनांक: २४ ते ३० सप्टेंबर २०२४
वेळ: सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत