प. बंगाल येथील ७ समकालीन प्रथितयश कलाकार : अशोक अधिकारी, चंदन मिश्रा, जयंत देबनाथ, समिर पॉल, सुमंत हुतैत, स्वकुसा, स्वपन बाला या कलाकारांचा समावेश
आंगिक ह्या कला संस्थेने आयोजित केलेले सामूहिक कला प्रदर्शन जहांगीर कलादालन, ऑडिटोरियम हॉल, मुंबई येथे २२ ते २८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत भरणार आहे. ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत विनामूल्य बघता येईल. या प्रदर्शनात अशोक अधिकारी, चंदन मिश्रा, जयंत देबनाथ, समिर पॉल, सुमंत हुतैत, स्वकुसा, स्वपन बाला या कलाकारांनी विविध माध्यमांचा व तंत्रशुद्ध शैलीचा वापर करून तयार केलेली चित्रे व शिल्पाकृती ठेवण्यात आले आहेत
आंगिक हे बिरूद एका बंगाली शब्दापासून निर्माण झाले आहे. ज्याचा अर्थ आहे माझी कार्यशैली व अभिव्यक्तीत व दर्शवणारी कार्यपद्धती व तिचे अनेकविध पैलू. गव्हर्मेंट कॉलेज ऑफ आर्ट अँड क्राफ्ट, कोलकाता येथून कलाक्षेत्रात पदवीधर होणाऱ्या १९९७ च्या कलाकारांचा समूह म्हणजे आंगिक असून ह्या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या ७ कलाकारांच्या तंत्रशुद्ध शैलीचे व अभिव्यक्तीत्वाचे सर्वांना एक रम्यदर्शन घडते. आजवर या समूहातील कलाकारांनी भारतातील विविध शहरात नामांकित कलादालनात आपल्या कलाकृतीचे प्रदर्शन भरवले असून त्यांच्या प्रदर्शनांना सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. अनेक मान्यवर संस्थांनी त्यांना पुरस्कृत केले आहे आणि भारतात, विदेशातही बऱ्याच मान्यवरांकडे त्यांची चित्रे व कलाकृती संग्रही आहेत.
अशोक अधिकारी यांच्या ॲक्रीलिक रंगसंगतीतील कॅनवासवरील चित्रांमध्ये सफरचंदाचे प्रतीक दर्शवले असून त्यापासून मानवाला मिळणारी ऊर्जा व उत्साह यांचे रम्य दर्शन सर्वांना घडते.
चंदन मिश्रा यांच्या मिक्स मिडियातील रंगसंगती कॅनवास बोर्डवर असून त्यात चित्रकाराने सकाळचे रम्य व शांत वातावरण आणि चित्रातील स्त्रीच्या मुखावर प्रकटलेली सुख समाधान आणि शांततेची तसेच समृद्धी दर्शवली आहे.
जयंत देबनाथ यांनी जल रंगाचा वापर करून १००% कॉटन पेपरवर साकारलेले त्यांचे चित्रे फार प्रभावी असून त्याद्वारे त्यांनी क्षितिजासह असणारा मानवी मनाचा बोलका सुसंवाद दर्शवला आहे. सकाळची शांत वातावरणात समुद्रकिनाऱ्यावरील बोटी व निरामय शांतता दर्शवताना त्यांनी अप्रतिम निसर्गचित्राचा आस्वाद घेण्याची संधी सर्वांना दिली आहे.
समिर पॉल यांनी ॲक्रीलिक रंगसंगतीचा कलात्मक वापर करून कॅनवासवर काढलेल्या चित्रांमध्ये वाराणसी येथे असणारे धार्मिक वातावरण, तेथील मंदिरे, पूजास्थाने, नदीचा घाट व तेथे सदैव असणारे जपजाप्य व मंत्रजागर आणि धार्मिक वातावरण फार कलात्मकतेने दाखवले आहे.
सुमंत हुतैत यांच्या कागदावरील पेन व शाई याचा उपयोग करून काढलेल्या चित्रांमध्ये भारतीय संगीतातील आलाप व शास्त्रीय संगीतामध्ये आढळणारी नादमयता व त्यातून पसरणाऱ्या आनंदलहरी यांचे सर्वांना प्रभावी व उत्कट दर्शन होते.
स्वकुशा यांच्या ब्राँझ माध्यमातून शिल्पांमध्ये आत्ममग्न व विचारात दंग असणाऱ्या माणसाचे भावविश्व साकारले आहे. यातील कलात्मकता फार अप्रतिम असून त्या शिल्पांमध्ये पृष्ठावरील पोत व प्रकाशमान झालेले झर घटक प्रकर्षाने दिसतात.
स्वपन बाला यांच्या तैलरंगातील कॅनवासवरील चित्रांमध्ये दोन प्रतिकात्मक प्रेमीच्या सहवासातील प्रकटणारे प्रेम, आत्मियता व भावनिक जवळीक कलाकाराने आपल्या शैलीत सादर केली आहे. विशुद्ध प्रेमभावना व अविष्कार तसेच ती सुखमय अनुभूती यांचा येथे सर्वांना अनुभव येतो.
स्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, ऑडिटोरियम हॉल, काळा घोडा, मुंबई
कालावधी: २२ ते २८ ऑक्टोबर २०२४
सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत