![]() |
चित्रकार: पॉल डिमेलो |
पॉल डिमेलो ह्याचे कलाशिक्षण BFA ( Applied Art ) पर्यंत सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ एप्लाईड आर्ट, मुंबई येथे झाले. तत्पूर्वी त्यांनी तेथे diploma इन A.T.C. (photography) हा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर त्यांनी मुंबईतील सुप्रसिद्ध कलादालनातून आपल्या चित्रांचे एकल व सामूहिक प्रदर्शनातून सादरीकरण केले. ह्यात मुख्यतः जहांगीर आर्ट गॅलरी, गॅलरी लीला, नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, आर्ट एंट्रन्स गॅलरी, आर्मि अँड नेव्ही बिल्डिंग, आर्ट प्लाझा वगैरेचा समावेश होतो. तसेच त्यांनी नेहरू सेंटर वरळी येथे कलास्पंदन आर्ट फेअर प्रबोधनकार आर्ट गॅलरी, बोरीवली येथे कलाप्रदर्शन, नॅशनल पेंटिंग स्पर्धा व वर्कशॉप - माउंट अबू राजस्थान व बुंदी राजस्थान येथे, इंटेरनशनल वॉटरकलर सोसायटी इंडिया, बिआनेल २०२२, नवी दिल्ली, पहिले ऑलिम्पि आर्ट -२०१९, वॉटरकलर सोसायटी ऑफ इंडिया, नवी दिल्ली, सहयोग सेंटर वसई येथे प्रदर्शन वगैरे ठिकाणी आपल्या चित्रांचे सादरीकरण केले. त्यांच्या चित्रांना नेहमी रसिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यांची चित्रे मुंबई, दिल्ली, कलकत्ता, लंडन ( यु. के. ) यु. एस. ए. वगैरे ठिकाणी मान्यवर संग्राहकांकडे संग्रही आहेत.
प्रस्तुत चित्रप्रदर्शनात त्यांनी ठेवलेली वैशिट्यपूर्ण चित्रे प्रामुख्याने वसई परिसरातील सृष्टीसौंदर्य व निसर्गाचे अवर्णनीय भांडार ह्याचे चित्रमय दर्शन सर्वाना घडवितात. तेथील शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला व बालपण त्या परिसरात गेल्यामुळे त्यांच्या मनातील त्या सुखद आठवणी आणि सध्या कालबाह्य होत असणारी काही जीवनमूल्ये ह्यांचे दर्शन येथे सर्वांना होते. तेथे बागायती शेतीची कामे करण्यासाठी लागणारी साधने व अवजारे, बैलांचा वापर करून गळाकार चक्राच्या साहाय्याने (मोट ) विहिरीतून पाणी काढून ते शेतीसाठी उपयोगात आणणे, जुनी कौलारू घरे व त्यांचे सौंदर्य, तेथे फुलणारी विविध फुले, फळ फळावळ, सृष्टीसौंदर्य, घरातील जुन्या वस्तू जसे जाते, कंदील, कासंडी, चरवी, बैलजोडी इत्यादी चे एक नयनरम्य व विलोभनीय दर्शन सर्वांना येथे घडते. तेथील साधी पण कलात्मक जीवनशैली, वस्त्रप्रावरणे, सण समारंभ, उत्सव व त्यांचे लोकांतर्फे साजरे होणारे उत्कट रूप वगैरेचे मनोहर दर्शन सर्वांना होते. शेतीमाल बाजारात बैलगाडीत नेताना शेतकरी कुटुंबाची मानसिकता व उत्कटता तसेच तत्परता वगैरे तेथील ग्रामीण परिसरातील सध्या जीवनशैलीचे विविध पैलू त्यांनी आपल्या कलात्मक शैलीत येथे सादर केले आहे.
चित्रकार: पॉल डिमेलो
स्थळ: जहांगिर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई
कालावधी: २५ नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२४
वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत