![]() |
चित्रकर्ती : विप्ता कापडिया |
विद्यमान कलाक्षेत्रातील एक प्रथितयश ज्येष्ठ चित्रकर्ती विप्ता कापडिया यांच्या चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगीर कलादालन, मुंबई ४००००१ येथे २१ ते २७ जानेवारी २०२५ या कालावधीत भरणार असून ते तेथे सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनात ठेवण्यात येणारी त्यांची विविधलक्षी चित्रे तैलरंग व ॲक्रिलिक रंग वापरून कॅनवासवर काढलेली आहेत. तसेच एनॅमल वापरून लोह व ताम्र अशा प्लेटवर त्यांनी साकारलेल्या कलात्मक कलाकृती यांचाही त्यात समावेश आहे.
ह्या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन प्रसिद्ध लेखिका व आर्ट क्युरेटर सुषमा सबनीस यांनी केले आहे व त्यात गेल्या सुमारे अर्धशतकाहून जास्त कालखंडात विप्ता कापडिया यांनी चित्रबद्ध केलेल्या व अनोख्या तसेच आगळ्यावेगळ्या भावपूर्ण शैलीत उत्कटपणे साकारलेल्या चित्राकृती सर्वांना बघता येतील.
विप्ता कापडिया यांचे कलाशिक्षण सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे झाले. त्या काळात त्यांना वासुदेव गायतोंडे, प्रफुल्ला डहाणूकर, एस. एच. रझा वगैरे सारख्या प्रतिथयश आधुनिकतेचा साज धारण करून वैशिष्ट्यपूर्ण चित्रनिर्मिती करणाऱ्या सुविख्यात चित्रकारांची शैली अगदी जवळून अवलोकन करण्याची व त्यापासून स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन स्वतःची चित्रशैली निर्माण करण्याची संधी लाभली. त्या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन लवकरच त्यांनी चित्रनिर्मिती करून त्या कलाकृती मुंबईसह, पुणे, भोपाळ वगैरे ठिकाणी नामवंत कला दालानातून रसिकांपुढे एकल व सामूहिक प्रदर्शनाच्या द्वारे ठेवल्यात. तसेच नामवंत चित्रप्रवर्तक संस्था व कलादालनांचे संचालक यांनी आयोजित केलेल्या अनेक कलाविषयक कार्यशाळा व आर्ट कॅम्प मध्ये त्यांनी सक्रिय भाग घेऊन आपली चित्रे सादर केलीत. त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान लाभलेत. त्यांच्या चित्रप्रदर्शनांना रसिक व कलाप्रेमी यांचा नेहमी उदंड व सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. त्यांची चित्रे भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, डेन्मार्क, इंडोनेशिया, जपान, सिंगापूर, इंग्लंड, अमेरिका वगैरे ठिकाणी संग्राहकांजवळ संग्रही आहेत.
त्यांच्या चित्रांमध्ये आधुनिकता व पारंपारिक कलात्मकता यांचा एक समन्वय आढळतो. भारतीय चित्रशैली, त्यातील परंपरा आणि शैली त्याबरोबरच त्यातील आधुनिकतेची सुसंगत वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना यांचा एक आगळावेगळा समन्वय सर्वांना आढळतो. सूक्ष्म निरीक्षणशक्ती व आकलनक्षमता समज, वैचारिक प्रगल्भता आणि सर्व सौंदर्यपूर्ण संकल्पनांचा चित्रात कलात्मकरीतीने समावेश करून त्यांनी त्या अनोख्या अमूर्त आणि भावपूर्ण अविष्कारातून साकारली भावपूर्णता, नादमयता व नेटकेपणासह त्यातून प्रकट केलेली छाया, प्रकाश, सावल्या, विविध ऋतूतील वातावरणातील बदल व त्याद्वारे सादर केलेली कलात्मक परिवर्तनशीलता सर्वांना एक सुखद आनंद व मनशांती देते. तसेच त्यातील दैवी संकल्पनातून लाभणारी निरामय उत्कटता आणि भावपूर्ण संवेदना ही केवळ-अवर्णनीय आहे. त्यांनी आपल्या कलाप्रवासातील काही कालखंड चित्रकलेच्या अध्यापनासाठी व त्याद्वारे आपली कलात्मक वैचारिक धनसंपदा लोकोत्तर पोचवण्याचे एक महान कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या चित्रसादरीकरणातील नेमकी वैशिष्ट्ये अनुभवण्यासाठी व त्या आत्मानंदात लीन होण्यासाठी नेहमी सर्व रसिक व कलाप्रेमी उत्सुक असतात. त्यांच्या साध्या व निगर्वी व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्या चित्रप्रदर्शनांना नेहमी सर्वांचा उदंड प्रतिसाद लाभतो.
विविध रंगलेपनातील वैशिष्ट्ये, त्यांच्या पोतातून साकारणारे अपेक्षित दृश्य परिणाम आणि त्या बोलक्या चित्रकृतीच्या अवलोकनातून सर्वांना मिळणारी आनंदमय व सुखद अनुभूती आणि मानसिक स्वास्थ्य तसेच निरामय शांतता केवळ-अवर्णनीयच. त्या चित्रसंपदेतून त्यांची साधी राहणी व वैचारिक प्रगल्भता यांचे सर्वांना दर्शन होते.