![]() |
चित्रकार : निलेश दादा निकम |
सुप्रसिद्ध चित्रकार निलेश दादा निकम ह्यांच्या नवनिर्मित चित्रांचे ‘इनर ट्रँकीलिटी’ हे एकल प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे २० ते २६ जानेवारी २०२५ ह्या दरम्यान भरणार आहे. तें तेथे सर्वांना रोज सकाळी ११ तें संध्याकाळी ७ ह्या कालावधीत विनामूल्य बघता येईल.
निलेश निकम यांचे कलाशिक्षण रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये झाले असून, जे. जे. स्कूल आर्टस मधून त्यांनी ए. टी. डी. ही पदवीका मिळवली आहे. आजवर त्यांच्या चित्रांची १० एकल प्रदर्शने भरली आहेत. मुंबई, ठाणे, पुणे, वसई, गोवा, चंदिगढ, नवी दिल्ली आणि दुबई अशा अनेक ठिकाणी भरलेल्या ४५ समूहचित्रप्रदर्शनांत त्यांनी सहभाग घेतला आहे. याआधीच्या कलाकृतीही 'ध्यानधारणे'वरच आधारित असून मानवी जीवन सुंदर व्हावे, हा त्यांच्या चित्रनिर्मितीचा ध्यास आहे.
विरार येथील प्रसिद्ध चित्रकार निलेश निकम यांची चित्रे अशाच एकाग्रचित्तावर भाष्य करणारी आहेत. ध्यानधारणेचं महत्त्व सांगणारी आहेत.
आपल्या आयुष्यातील एक दिवस वाईट जातो. खरंतर, तो एक अपघात असतो; पण सकारात्मक एनर्जी मिळवण्यासाठी एकाग्र झाल्यास ती साधना आपल्याला मनःशांती देणारी ठरू शकते. त्यासाठी कुठेतरी एकाग्रचित्ताने पाहण्याची गरज असते. त्या एकाग्रतेचे महत्त्व सांगणाऱ्या, ध्यानसाधनेतून मनःशांती मिळवण्याचा विश्वास जागवणाऱ्या निलेश निकम यांच्या कलाकृती आहेत. हा चित्राविष्कार योगसाधनेतील त्राटकावर आधारलेला आहेत. या योगसाधनेत चिन्ह, चित्र, मूर्ती, वर्तुळ, बिंदू, ज्योत, सूर्य किंवा चंद्र याकडे एकटक पाहत राहायचे. एकाग्र व्हायचे. आपल्या भरकटलेल्या मनाला स्थिर करायचे. त्यातून आपल्याला मनःशांतीचा अनुभव येत असतो. या त्राटक योगसाधनेनुसार निलेश निकम यांनी वेगवेगळ्या प्रतिमांचे कोंदण करून, त्यात चित्ररसिकांना गुंतवून, ध्यानधारणेकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
निलेश यांनी चित्रात मोठ्या वर्तुळातून छोट्याछोट्या वर्तुळांची निर्मिती केली. या वर्तुळांत आपली नजर त्या छोट्याछोट्या वर्तुळात गुंतत जाते आणि शेवटी त्याच वर्तुळातील एका छोट्या बिंदूवर स्थिरावते. केंद्रित होते. त्या बिंदूवर आपली नजर स्थिरावली की, आपल्या मनातील विचार वर्तुळाच्या परिघाबाहेर फेकले जातात. मनातल्या विचारांची
गर्दी संपली की, आपोआपच एक स्वच्छ रितेपण आपले मन शांत करत असते. स्थिर करत असते.
निकम यांनी वर्तुळांसोबतच कासव, कमळ, बेलपान, शंख, डमरु, लक्ष्मीची पावलं, पिंपळाचं पान, सूर्य, चंद्र अशा काही पॉझिटिव्ह एनर्जी देणाऱ्या प्रतिमांचाही वापर केला आहे. प्रत्येक माणसाची श्रद्धास्थाने, स्फूर्तिस्थळे, स्मृतिचिन्हे आणि प्रेरणास्थळेही वेगवेगळी असतात. त्यानुसार, निलेश यांनी या प्रतिमांचा वापर केला आहे. प्रत्येकाने त्याच्या श्रद्धेनुसार प्रतिमा निवडल्या, तरी कलाकाराचा उद्देश रसिकांनी एकाग्र व्हावे, गुंतावे हाच आहे.
या ध्यानधारणेसाठी चित्रच असावीत, असा निकम यांचा आग्रह नाही. घरात असलेल्या कुठल्याही वस्तूकडे, प्रतिमेकडे, चित्राकडे पाहून ही साधना करता येते, हेही त्यांना सुचवावेसे वाटते. या साधनेचे महत्त्व सांगण्याचे काम त्यांच्या कलाकृतींनी केले आहे. चित्र हे मानवी मनाला आनंद देतात, विचार करायला लावतात. ज्ञान देणारी असतात. निकम यांची चित्रं ध्यानधारणेचं ज्ञान देणारी आहेत. रसिकांना प्रेरणा देणारी आहेत. मनःशांती मिळवण्यासाठी चालवलेली एक चळवळ आहे. ध्यानधारणेची संकल्पना रुजवण्यासाठी साकारलेली ही चित्रे आहेत. त्यासाठी त्यांनी यशाचे प्रतीक असलेल्या गोल्डन,सिल्व्हर आणि ब्रॉण्झ या रंगांचा खुबीने वापर केला आहे.
आयुष्यातील प्रवासात वेगवेगळे अनुभव येत असतात. काही अपघात होत असतात. काही क्लेषकारक घटना घडत असतात. त्यातून, बाहेर पडण्यासाठी आपले मन सैरभैर न होता, त्यातून बाहेर पडण्याची ताकद मिळवणे महत्त्वाचे असते. त्यासाठी काही ध्यानधारणेचे प्रयोग आपल्याला मनःशांती मिळवण्याची ऊर्जा देत असतात. ही ऊर्जा मिळवण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या निकम यांच्या या चित्रकलाकृती आहेत.
चित्रकार: निलेश दादा निकम
जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई
२० ते २६ जानेवारी २०२५
सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा