![]() |
चित्रकार: विजय कियावत |
पुणे येथील सुप्रसिद्ध चित्रकार विजय कियावत यांच्या जलरंगात निर्मिलेल्या अनोख्या चित्रांचे एकल प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा मुंबई ४००००१ येथे २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ ह्या दरम्यान भरणार आहे. सर्वांना रोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत विनामूल्य बघता येईल. ह्या प्रदर्शनात त्यांनी ठेवलेली चित्रे 'माँक्स’-लिजेंड्स अँड ट्रॅडिशन्स' ह्या संकल्पनेवर आधारित असून त्यात प्रामुख्याने भिक्षू आणि त्यांची पारंपारिक भव्यता व त्यांच्याशी निगडित विविध रूढी यांचा समावेश आहे.
विजय कियावत यांनी IIT मधून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यावर सुमारे चार दशके कॉर्पोरेट CEO म्हणून नामवंत कंपन्यातून काम केले. दिल्लीतील भव्यदिव्य उद्याने, निसर्गातील विविध ऋतूतील चमत्कृती, झाडे, फुले, वनस्पती व त्यापासून दरवळणारा सुवास वगैरेंनी त्यांना प्रभावित केले. तसेच मनिष पुष्कले, वसुंधरा तिवारी ब्रूटा, सुरिंदर कौर, राजेश शर्मा ह्या दिल्लीतील नामवंत कलाकारांकडून व कॅलिफोर्निया बर्कले येथील जुली कॉहन व नाफा. सिंगापूर येथील रेमंड याप यांकडून त्यांना बहुमूल्य मार्गदर्शनाचा लाभ झाला. त्यांनी मुंबई, नवी दिल्ली, सिंगापूर, लंडन, अमेरिका येथे अनेक एकल व सामूहिक प्रदर्शनातून आपली चित्रे रसिकांपुढे ठेवलीत. त्यांच्या चित्रांचा २०१४ मध्ये इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली यांच्या वार्षिक मासिकात सन्माननीय समावेश करण्यात आला. त्यांनी अनेक कलाविषयक उपक्रमातून आर्ट कॅम्पस् ,वर्कशॉप वगैरेच्या माध्यमातून चित्रकलेच्या प्रसारासाठी आपले योगदान दिले आहे. AIFACS व Camlin यांच्यातर्फे आयोजित ३ राष्ट्रीय चित्रप्रदर्शनातून त्यांनी आपली चित्रे ठेवली होती. साहित्य कलापरिषद ह्या दिल्ली सरकारतर्फे आयोजित साहित्यिक उपक्रमात त्यांनी भाग घेतला व त्यांच्यातर्फे त्यांचा सन्माननीय सदस्य म्हणून गौरविण्यात आले. त्यांच्या चित्रांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे व भारतातील आणि विदेशातील अनेक मान्यवर संग्राहकांकडे त्यांची चित्रे संग्रही आहेत.'अष्टगुरु' ह्या मुंबईतील कलाप्रवर्तक संस्थेतर्फे त्यांचे चित्र ऑक्टोबर २०२४ मध्ये आंतरराष्ट्रीय लिलावात विकले गेले.
प्रस्तुत चित्रप्रदर्शनात त्यांनी बौद्धभिक्षू व त्यांची पारंपारिक भव्यता व त्यांच्याशी निगडित धार्मिक रितीरिवाज ह्यावर आधारित जलरंगात कलात्मकतेने नटविलेली आपली वैविध्यपूर्ण चित्रे ठेवली आहेत. त्यांच्या चित्रांमध्ये मुख्यतः निसर्गाविषयी उत्कट प्रेम, सकारात्मक आणि विविध धार्मिक रूढी व परंपरा तसेच त्यातील रीतीरिवाज यांचे अभूतपूर्व दर्शन सर्वांना घडते. साहित्याचा अभ्यास कलात्मकता प्रवासातील अनुभव व त्यावर आधारित संकल्पना तत्त्वज्ञान ऐतिहासिक परंपरा व भारताचा गौरवपूर्ण पूर्व इतिहास आणि त्यातील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना यांचे उत्कट व मनोज्ञदर्शन त्यांच्या चित्रांमध्ये सर्वांना घडते व प्रभावित करते. बौद्ध भिक्षूंच्या धार्मिक संकल्पना, रूढी परंपरा, धर्मप्रसारासाठी त्यांचे अविरत होणारे प्रयत्न, आत्मिक शांततापूर्ण संकल्पनातून साकारणाऱ्या संवेदना आणि त्या उत्कट रंगलेपणातून व प्रतिकात्मक निवेदनातून सर्वांना आकर्षित करणारी प्रभावशाली व बोलकी चित्रशैली ह्या सर्वांच्या समावेशामुळे ही चित्रसंपदा सर्व रसिकांशी सुसंवाद साधते.
चित्रकार: विजय कियावत
प्रदर्शन: "माँक्स - लिजेंड्स अँड ट्रॅडिशन्स" स्थळ:जहांगीर कलादालन, काळा घोडा मुंबई
कालावधी: २४ फेब्रुवारी ते २ मार्च २०२५ वेळ: सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : ९८१००३८२१२