![]() |
चित्रकर्ती: रागिणी सिनकर |
काही चित्रं आपलं लक्ष वेधून घेतात तर काही हळूच आपल्या अंतर्मनात एक ठसा उमटवून जातात. रागिणी सिनकर यांचे कॅस्केड ऑफ शेड्स हे प्रस्तुत चित्र प्रदर्शन अशाच प्रकारचा अनुभव रसिकांना देतील. नाशिकस्थित चित्रकार रागिणी सिनकर यांचे हे चित्र प्रदर्शन प्रसिद्ध अशा जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई येथे दि २१ ते २७ एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन २१ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३ वाजता मुंबईतील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी येथे होणार आहे. हे उद्घाटन महाराष्ट्र विधान परिषदेचे सन्माननीय सदस्य प्रविण दरेकर आणि सुप्रसिद्ध अक्षरशिल्पकार व डिझायनर अच्युत पालव यांच्या हस्ते होईल.
Cascade of Shades मधील प्रत्येक कॅनव्हास जिवंत आणि गतिशील वाटतो. रागिणी यांचे ब्रशस्ट्रोक्स हे जिवंत आहेत. त्यांची गतिमानता आणि उस्फूर्तता रंगांना कॅनव्हासवर जिवंत करते.
अत्यंत पारदर्शक रंगांचे थर, रंगांमधला सूक्ष्म विरोधाभास आणि स्ट्रोक्सच्या उस्फूर्ततेतून साधलेली सुसंगती उपयोग करून रागिणी यांची अमूर्त रचना 'समज' आणि 'कल्पना' यांच्यामधील नाजूक पूल शोधते. ती आपल्याला थांबायला, विचार करायला, हरवून जायला — आणि कदाचित स्वतःला शोधायला आमंत्रण देतात.
सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथून पदवीधर असलेल्या रागिणी यांनी १९९८ मध्ये A.T.D. ही पदविका प्रथम क्रमांकाने पूर्ण केली आणि २००२ मध्ये ड्रॉईंग व पेंटिंगमध्ये B.F.A. पूर्ण केले. त्यांच्या कलाकृती मुंबईतील अनेक प्रतिष्ठित गॅलरींमध्ये प्रदर्शित झाल्या आहेत. जहांगीर, नेहरू सेंटर, आणि सिम्रोजा आर्ट गॅलरीमध्ये त्यांची एकल आणि समूह प्रदर्शने आयोजित करण्यात आलेली आहेत.
त्यांना डिझाईन, ऑब्जेक्ट ड्रॉइंग, पोर्ट्रेट, स्केचिंग आणि कोलाज माध्यमातून केलेल्या कामासाठी पुरस्कार प्राप्त झाले असून, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, कॅमलिन आर्ट फाउंडेशन, बॉम्बे आर्ट सोसायटी तसेच अनेक महिलांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनांमधून त्यांनी भारतीय कला क्षेत्रात सक्रिय योगदान दिले आहे.
Cascade of Shades हे प्रदर्शन २१ ते २७ एप्रिलदरम्यान दररोज सकाळी ११ ते सायं. ७ या वेळेत कला रसिकांना पाहता येईल.
चित्रकर्ती: रागिणी सिनकर
स्थळ : जहांगीर आर्ट गॅलरी, काळा, घोडा, मुंबई
दिनांक २१ ते २७ एप्रिल २०२५
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ या वेळेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा