![]() |
शिल्पकार किरण शिगवण |
सुप्रसिद्ध शिल्पकार किरण शिगवण यांच्या नवनिर्मित शिल्पकृतींचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळा घोडा, मुंबई ४००००१ येथे २५ ते ३१ मार्च २०२५ या दरम्यान भरणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन २५ मार्च २०२५ रोजी संध्याकाळी ५.३० वाजता जहांगीर कलादालन, मुंबई येथे प्रमुख अतिथी प्रा. प्रकाश अर्जुन राजेर्शिर्के -चेअरमन, सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे यांच्या हस्ते होणार आहे.
या प्रदर्शनात त्यांनी ब्राँझ व FRP यांचा कलात्मक वापर करून तयार केलेल्या अनेक उत्तम कलाकृती व रचनात्मक शैलीत बनवलेली अभूतपूर्व शिल्पे ठेवण्यात येणार आहेत.
किरण शिगवण मूळचे कोकणनिवासी. त्यांचे कलाशिक्षण G.D. Art (Sculpture and modelling) पर्यंत सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे येथे झाले. नंतर त्यांनी मुंबई व आसपासच्या नामवंत कलादालनात आपल्या शिल्पाकृती प्रदर्शनात ठेवल्यात. तसेच जयपूर व कोल्हापुर येथे झालेल्या आर्ट कॅम्प व वर्कशॉप मध्ये त्यांनी सक्रिय भाग घेऊन आपले योगदान दिले. द बॉम्बे आर्ट सोसायटी, मुंबई, सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया मुंबई, महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन वगैरे सारख्या नामवंत कलाप्रवर्तक संस्थांनी त्यांना पारितोषिके देऊन वेळोवेळी त्यांचा गौरव केला आहे. त्यांच्या अनोख्या शिल्पाकृती भारतातील व विदेशातील अनेक प्रथितयश कलासंग्राहकांजवळ संग्रही आहेत.
प्रस्तुत प्रदर्शनात किरण शिगवण यांनी आपल्या कलात्मक व वैशिष्ट्यपूर्ण शैलीत बनविलेल्या विविध शिल्पाकृती ठेवल्या आहेत. ब्राँझ व FRP यांचा अतिशय उत्तम वापर करून योग्य असा समन्वय साधून त्यांनी येथे ठेवलेल्या विविध कलाकृती नयनरम्य व मनमोहक आहेत. घोडे, बैल, नंदी, देवी देवतांच्या मूर्ती, इतर कलात्मक संवेदनशील कलाकृती येथे त्यांनी आपल्या खास वैविध्यपूर्ण शैलीत ठेवल्या आहेत. मानवी जीवनातील संवेदना, निसर्ग व धार्मिक संकल्पना आणि त्यांची अनोखी अनुभूती यावर आधारित विविधांगी कलारूपे त्यांनी तयार केली आहेत व एका कलात्मक दृष्टिकोनातून येथे सादर केली आहेत. त्या शिल्पांचे विविध आकार, त्यांची मनोहारी रूपे, त्यावर साकारलेले पोत व अनेक कलात्मक आणि उत्कट तसेच भावपूर्ण धार्मिक संकल्पना प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला एक आगळावेगळा दृश्यानुभव व अनुभूती देतात. संस्कृती, निसर्ग आणि त्यांच्या परस्परातील अतूट अशा दैवी रचनात्मक संवेदनशील संकल्पना यांचा यथायोग्य समन्वय साधून त्यानी आपली वैशिष्ट्यपूर्ण व बोलकी कलानिर्मिती येथे सादर केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा